पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ २०२२) उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार तुर्कस्तानचा चित्रपट ’बिट्वीन टू डॉन्स’ या चित्रपटाला, तर उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘पोटरा’ या चित्रपटाला मिळाला.
महाराष्ट्र शासनाचा १० लाख रुपयांचा ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सलमान नाकर दिग्दर्शित ‘बिट्वीन टू डॉन्स’ या चित्रपटाला मिळाला. महाराष्ट्र शासनाचा ५ लाख रुपयांचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’ या चित्रपटाला मिळाला.
‘पिफ २०२२’चा समारोप समारंभ आज संध्याकाळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये पार पडला. ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील पटकथाकार रुमी जाफरी आणि पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार निखिल महाजन यांना ‘गोदावरी’ या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट पटकथा पुरस्कार ‘पोटरा’ या चित्रपटासाठी शंकर अर्जुन धोत्रे यांना मिळाला. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार ‘निवास’ या चित्रपटासाठी रमेश भोसले आणि शमीन कुलकर्णी यांना ‘गोदावरी’ या चित्रपटासाठी विभागून देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छकुली देवकर हिला ‘पोटरा’ या चित्रपटासाठी मिळाला तर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘दिलीप प्रभावळकर’ यांना ‘आता वेळ झाली’ या चित्रपटासाठी मिळाला. संगीताचा विशेष ज्युरी पुरस्कार ‘गोदावरी’साठी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांना मिळाला.
उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक पुरस्कार ‘१०७ मदर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर केरकेस यांना मिळाला. हा चित्रपट युक्रेनमध्ये चित्रित करण्यात आला आहे. पीटर यांनी ऑनलाइन प्रतिक्रिया देताना युक्रेनियन टीमची आठवण काढली आणि त्यांच्या टीमपैकी काहीजण कीव्हमध्ये बॉम्ब वर्षावाचा सामना करीत असल्याचे सांगितले. एमआयटी ह्युमन स्पिरिट पुरस्कार अलेक्सी जर्मन ज्युनिअर दिग्दर्शित ‘हाऊस अरेस्ट’ या रशियन चित्रपटाला मिळाला. ‘प्ले ग्राउंड’ या चित्रपटातील ‘नोरा’ या भूमिकेसाठी माया वांडरबेक यांना आणि ‘इरेजिंग फ्रॅंक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गेबोर फेब्रिशिअस यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.
यावेळी बोलताना गिरीश कासारवल्ली म्हणाले, “चित्रपट महोत्सवामध्ये इतर चित्रपट दिग्दर्शकांना आपले चित्रपट दाखवता येतात आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून आपण चित्रपट शिकत जातो. त्यामुळे चित्रपट महोत्सव गरजेचे आहेत.”
पटकथा लेखक रुमी जाफरी म्हणाले, “मी अनेक व्यावसायिक चित्रपट लिहिले. पण माझ्या घरातून साहित्यिक पार्श्वभूमी होती आणि वेगळा चित्रपट बनवण्याचा आग्रह होत होता. वेगळा चित्रपट तयार करावा असे मलाही वाटत होते. त्यातून एक वेगळा चित्रपट ‘चेहरे’ हा तयार झाला.”
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ‘एनएफडीसी’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ‘पिफ’चे सरचिटणीस रवी गुप्ता, नाटककार सतीश आळेकर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘पिफ’च्या संयोजन समितीचे सदस्य समर नखाते, मकरंद साठे, अभिजित रणदिवे अभिजित देशपांडे यावेळी उपस्थित होते.
समर नखाते यांनी आभार मानले. आदित्य मोरे, गायत्री मुळे यांनी सूत्रसंचालन केले.