मराठा आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे गेले काही दिवस उपोषणाला बसले आहेत. शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरु होते मात्र या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघालं आहे. आता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार आहे. या चित्रपटात स्वतः मनोज जरांगे पाटील हे सुद्धा भूमिका सााकारणार असल्याचे समजत आहे.
‘हा’ अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील यांची भुमिका ?
मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे करत आहेत. तर डी गोवर्धन दोलताडे सिनेमाचे निर्माते आहेत. अभिनेता रोहन पाटील सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकारणार असं समजतंय. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर 2023 पासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
कोण आहेत मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून मनोज मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत. सर्वसामान्य परिस्थिती वाढलेल्या मनोज यांचे शिक्षण 12 पर्यंत झालं आहे. हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. मनोज जरांगे हे 2011 पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते. याशिवाय 2015 ते 2023 या आठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.