चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. दिग्दर्शकाला जे आणि जसं म्हणायचं आहे ते तो चित्रपटात मांडतो. मग समोर कितीही मोठा कलाकार असो. नागराज मंजुळे या संवेदनशील दिग्दर्शकाच्या ‘झुंड’ बाबत तेच म्हणता येईल.
मेहनत, अभ्यास, चिकाटी, जिद्द या सगळ्याचा जोरावर त्यांनी हा चित्रपट घडवला आहे. आजवरच्या प्रत्येक कलाकृतीत नागराज मंजुळे काहीतरी सांगू पाहतात: पण हे सांगणं शब्दबंबाळ नाही हेच त्यांच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
‘झुंड’ मध्येही त्यांनी महत्त्वाचा विषय प्रश्न उपस्थित केला आहे. जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. खेळ प्रशिक्षक असलेल्या विजय बारसे यांच्या आयुष्यावर बेतलेली गोष्ट झुंडमध्ये दाखवली आहे. नागपूरस्थित समाजसेवक विजय बारसे यांनी तिथल्या झोपडवासीय मुलांचं फुटबॉल या खेळातल कौशल्य ओळखून त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर त्यांनी स्लम सॉकर या संस्थेची स्थापना केली. हा प्रवास चित्रपटात आहे. विजय (अमिताभ बच्चन) या मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांची टीम बनवायची ठरवतात. यातले अडथळे, संघर्ष आणि प्रश्न हा सगळा प्रवास म्हणजे नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’.