Breaking News

चारचाकी चालवताना नापास झालात तरी धीर सोडू नका…(व्हिडिओ)

306 0

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला(आरटीओ) दोन स्टिम्युलेटर प्राप्त झाले असून त्याद्वारे रोज किमान 50 उमेदवारांना पंधरा मिनिटांचे चार चाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे जे चार चाकीच्या टेस्ट मध्ये नापास झाले अथवा ज्यांना टेस्ट देण्यापूर्वी कार चालविण्याचे प्रशिक्षण घ्यायचे, त्यांच्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.

रोज जवळपास 50 उमेदवारांना सिम्युलेटरवर आभासी प्रशिक्षण दिले जात आहे. नाशिक फाटा येथील आयडीटीआर (इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च) या संस्थेतील ट्रॅकवर पुणे आरटीओच्या वतीने चारचाकीचे वाहन परवानासाठीचे टेस्ट घेतले जात आहे. या टेस्टमध्ये आठ अंक, एच या अक्षरात चारचाकी चालवून टेस्ट दिली जाते, शिवाय गतिरोधक, चढ व उतार हे देखील असतात.

वाहन चालविताना ते बंद पडू नये असा दंडक आहे. वाहन बंद पडल्यास टेस्टमध्ये फेल केले जाते. अनेकांना चारचाकी चालविता येत असली तरी आत्मविश्वास नसल्याने ते टेस्टमध्ये अनुत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी हा प्रयोग चांगला ठरत आहे.

कसं मिळते प्रशिक्षण

तीन संगणक एकमेकांना जोडलेले असतात. उमेदवार जेव्हा प्रशिक्षणास सुरुवात करतो. तेव्हा त्याला स्क्रीनवर रस्त्यावर ज्याप्रमाणे वाहने धावत आहे त्याचा आभास होण्यास सुरुवात होते. यंत्रणेच्या सहाय्याने ते वाहन चालवत आहे असे स्वतःला जाणवते शिवाय रस्त्यावर येणारे गतिरोधक, सिग्नल पार करत आपले वाहन धावत राहते. तसेच ऊन, वारा, पाऊस यामध्ये वाहन सुरक्षितरित्या चालविण्याचे कसब येथे वाहनचालकास दाखवावे लागते. अशा प्रकारे प्रशिक्षण मिळते.

नापासांचे प्रमाण कमी झाले

पुणे आरटीओ कार्यालयाला दोन स्टिम्युलेटर प्राप्त झाले त्यावर टेस्ट देण्यापूर्वी काही उमेदवार प्रशिक्षण घेतात. एका उमेदवारास 10 ते 12 मिनिटांचा वेळ लागतो. प्रशिक्षण घेतल्याने त्यांना टेस्ट देताना सोपे जाते. काहींचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आता अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!