मुंबई- अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई करून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6 कोटींची मालमत्ता जप्त केली. आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे कुटुंबियांचे आणखी सहा घोटाळे समोर येणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला.
सोमय्या म्हणाले की, श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यावर गेले तीन वर्ष मी पाठपुरावा करतोय. कोट्यवधींच्या मालमत्तेत 30 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. कोट्यवधी रुपये आणि सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार आहे. कालच्या प्रकरणात एक पाऊल पुढे जायचे, तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय ? उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे संबंध काय, असा सवाल सोमय्यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी म्हटले की, आदित्यने 2014 मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक अॅण्ड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आता ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. आदित्य श्रीधर आणि रश्मी यांच्यात कौटुंबिक संबंधासोबत आर्थिक संबंध आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे अशीही मागणी सोमय्या यांनी केली. शेल कंपन्याच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मनी लाँड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देण्याची मागणी सोमय्या यांनी केली.