न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आरबीआयने मुंबईच्या न्यू इंडिया सहकारी बँकेवर लादलेल्या या बंदीअंतर्गत, बँकेला नवीन कर्ज देण्याची किंवा ठेवी काढण्याची परवानगी राहणार नाही. त्यामुळे आपले पैसे परत मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली आहे. पैसे पुन्हा मिळणार की नाही या भीतीने बँकेचे ग्राहक, ठेवीदार संभ्रमात आले आहेत. पण ही बँक संकटात का आली? बँकेचं आता पुढे काय होणार? ग्राहकांच्या ठेवींचं काय होणार? ग्राहकांचे पैसे परत मिळणार का? बँक बुडाली तर ग्राहकांच्या ठेवी बुडणार का? पैसे कधी काढता येतील? असे अनेक प्रश्न बँकेच्या ग्राहकांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत.
आरबीआयने न्यू इंडिया सहकारी बँकेवर अचानक निर्बंध टाकल्यानंतर खातेधारकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांचे घर हे ठेवींवरील व्याजावर चालत होते. मात्र, आता आयुष्याची गोळा केलेली जमापुंजी परत मिळणार का, या भीतीने ग्राहकांनी टाहो फोडलाय. आरबीआयने केलेली कारवाई ही एका रात्रीत झालेली नाही. बँकेच्या व्यवहारावर आणि रोखीवर आरबीआयने ठपका ठेवत कारवाई केलेली आहे. बँकेच्या व्यवहारावर काही महिन्यांपासून आरबीआयचे लक्ष होते. बँक सातत्याने तोट्यात होती. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये बँकेला 53 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँकेचा एनपीएदेखील वाढला. त्यामुळे आरबीआयला ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी कारवाई करावी लागली आहे.