अहमदनगर- सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. राजकारणातील त्यांच्या सहा दशकाच्या काळामध्ये त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा पसरली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.