नवी दिल्ली- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होत आहे. विलीनीकरणाच्या या करारांतर्गत एचडीएफसी बँकेत 41% वाटा असणार आहे. त्याचप्रमाणे या विलीनीकरणात कंपनीचे भागधारक आणि कर्जदार यांचाही सहभाग असेल. छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.
पुढील आर्थिक वर्षात दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत प्रक्रिया पूर्ण होईल, असे HDFC बँकेकडून सांगण्यात आले आहे. या नव्या घोषणेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 60 हजाराच्या पलिकडे केला आहे. तर निफ्टीचीही 18 हजाराच्या दिशेने घोडदौड आहे.
HDFC लिमिटेडचे चेअरमन दीपक पारेख म्हणाले की, हे समानांचे विलीनीकरण आहे. आम्हाला विश्वास आहे की RERA च्या अंमलबजावणीमुळे, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, परवडणाऱ्या घरांसाठी सरकारी पुढाकार, यासह इतर गोष्टींमुळे गृहनिर्माण वित्त व्यवसायाला मोठी चालना मिळेल.
गृहनिर्माण विकास वित्त निगम (HDFC) बोर्डाने त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्स लिमिटेडचे एचडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. एचडीएफसीने सांगितले की, प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याच्या ग्राहकांना याचा फायदा होईल.
दीपक पारेख पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत बँका आणि NBFCच्या अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणाची शक्यता निर्माण झाली. यामुळे मोठ्या ताळेबंदाला मोठ्या पायाभूत सुविधा कर्जाची व्यवस्था करण्याची संधी मिळाली. त्याच वेळी, अर्थव्यवस्थेची पत वाढ वाढली. परवडणाऱ्या घरांना चालना मिळाली आणि कृषीसह सर्व प्राधान्य क्षेत्रांना पूर्वीपेक्षा जास्त कर्ज दिले गेले.