‘आमच्या एरियात वर्गणी गोळा का करतो’, म्हणत तरुणावर कोयत्याने वार
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहेत. गणेश मंडळांमध्ये तयारीची लगबग सुरू आहे. मात्र पिंपरी चिंचवड मधील वर्गणी गोळा करण्यावरून एका तरुणाला बेदम हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. महेश प्रदीप गुणेवाड असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे रिक्षा चालक असून रोकडे वस्तीत राहणाऱ्या आपल्या काही सहकार्यांकडे गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी चार-पाच जणांच्या टोळक्याने हातात कोयते, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि काठी घेऊन फिर्यादींना दमदाटी केली. हा संपूर्ण प्रकार पाहून परिसरातील दुकानदारांनी त्वरित दुकाने बंद केली. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच या आरोपींनी ‘तू आमच्या एरियात वर्गणी गोळा का करतोस’, असे म्हणत फिर्यादींना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. ज्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादींकडे असलेली गणेश वर्गणीची 17 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रज्वल रोकडे, मानव रोकडे, ओम नरवडे, यश नरवडे (सर्व रा. रोकडे वस्ती, चिखली) व त्यांच्या आणखी चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.