महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे म्हटले जाते. मात्र पुरोगामी महाराष्ट्राच्या याच प्रतिमेला तडा जाईल अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. कायद्यानुसार नोंदणी पद्धतीने म्हणजेच रजिस्टर पद्धतीने विवाह केल्याने एका तरुणीच्या संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या या मानसिक त्रासाला कंटाळून या पीडित कुटुंबाने दापोली पोलीस ठाण्यात मुस्लिम जात पंचायतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
रत्नागिरी जिल्ह्यातील अडखळ इरफानिया मोहल्ला या परिसरात जावेद पटेल यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. जावेद पटेल यांच्या मुलीने काही महिन्यांपूर्वी परंपरागत रितीरिवाजांचे खंडन करत रजिस्टर मॅरेज केले होते. परंपरेनुसार विवाह न केल्यामुळे या गावातील सात पंचायतीने पटेल यांच्या कुटुंबाला वाईट टाकण्याचा निर्णय घेतला. पटेल कुटुंबीयांना बहिष्कृत करून दोन वर्ष वाळीत टाकण्याचा निर्णय झाला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. असा धक्कादायक खुलासा पटेल यांनी फिर्यादीतून केला आहे.
पटेल कुटुंबीयांना बहिष्कृत करताना जात पंचायतीने काही अटी देखील घातल्या. विवाह केलेल्या या मुलीशी कुटुंबाने दोन वर्ष कोणतेही संबंध ठेवू नयेत. मुलीला तिच्या माहेरी येता येणार नाही. कुटुंबीयांना सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. या अटी मान्य नसल्यास तीस हजार रुपये दंड भरून कुटुंबाला समाजात सामावून घेतले जाईल. अशा प्रकारच्या अटी जातपंचायतीने घातल्याचे फिर्यादींनी सांगितले.
या प्रकरणामुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायत जिवंत आहे. जातपंचायतीच्या कर्मठ विचारसरणीचा फटका आजही अनेक कुटुंबांना बसत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.