कोलकत्यातील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्या विरोधात आणखी काही सबळ पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज सीबीआयने हस्तगत केले असून त्या ठिकाणहून संजय रॉय विरोधातील पुरावे हाती लागले आहेत.
घटनास्थळ असलेल्या सेमिनार रूम जवळील हे सीसीटीव्ही फुटेज असून यामध्ये संजय रॉय आढळून येत आहे. यावेळी आरोपीच्या गळ्यात ब्लूटूथ इयरफोनही दिसून येत आहेत. दरम्यान संजय रॉय यांनी आपला गुन्हा कबूल केल्यामुळे सध्या तो सीबीआयच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीतून संजय रॉय याने सुरुवातीला आपला पुन्हा कबूल केला होता. मात्र त्यानंतर ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे. त्यामुळे माझी पॉलीग्राफी चाचणी करा त्यातून माझे निर्दोषत्व सिद्ध होईल’, असे आरोपी म्हणाला होता.
सीबीआयने शुक्रवारी संजय रॉय याला सियालदह न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी त्याला तो पॉलीग्राफी चाचणीसाठी तयार का झाला? त्याने संमती का दिली? ते विचारले असता तो रडू लागला. ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे. त्यामुळे माझी पॉलीग्राफी चाचणी करा त्यातून माझे निर्दोषत्व सिद्ध होईल’, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे आज त्याची पॉलीग्राफी टेस्ट होण्याची शक्यता आहे.
यादरम्यान सीबीआयने सेमिनार हॉलच्या दिशेने जात असलेल्या संशयीतांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यामध्ये हॉलच्या दिशेने संशयीत जात होता तो संजय रॉय होता. संजय रॉय नंतर तीन ते साडेपाच या वेळेत दुसरा कोणीही संशयित व्यक्ती सेमिनार हॉल कडे जाताना दिसलेला नाही. जे लोक जाताना दिसले ते चार ते पाच मिनिटांच्या आत आपली कामे करताना दिसून आले. त्यामुळे संजय रॉय हा एकटाच सेमिनार हॉलमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबलेला आढळून आला. त्याचबरोबर त्याचा ब्लूटूथ हेडफोन देखील सेमिनार हॉल मधूनच जप्त झाला होता. त्यामुळे आरोपी बऱ्याच काळ तिथे थांबला होता हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आणखी सबळ पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याने तपासाला वेग आला आहे.