Gadchiroli News

Gadchiroli News : अख्खं कुटुंब उद्ध्वस्त ! भीषण अपघातात महिलेसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

5079 0

गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे. प्रियंका गणेश जनध्यालवार (24), रुद्र गणेश जनध्यालवार (5) आणि भावना नरेंद्र जनध्यालवार (45) अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र नरेश जनध्यालवार (52) हे या अपघातात जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
मार्कंडादेव (ता.चामोर्शी) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी 4 वाजता दुचाकीवरुन (एमएच 33 के-3135) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी 08 एयू- 9045) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्यानंतर 10 ते 15 फूट फरफटत गेली. रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

या अपघातानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. हा अपघात एवढा भीषण होता कि, ट्रकमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला होता. धक्कादायक म्हणजे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या रुद्र याचे वडील गणेश जनध्यालवार यांचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जनध्यालवार कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide