राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचे पुत्र वनराज आंदेकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. काल या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक झाली होती. तर आता या हल्ल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे.
1 सप्टेंबर रोजी पुण्यातील नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर यांच्यावर 13 ते 14 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यानंतर कोयत्याने वारही केले. यात वनराज यांचा मृत्यू झाला. तर त्यावेळी त्यांच्याबरोबर चुलत भाऊ शिवम आंदेकर देखील होते. त्यांच्यावर देखील गोळी झाडण्यात आली मात्र वेळीच खाली वाकल्याने त्यांना गोळी लागली नाही. आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. वनराज आंदेकर हत्याकांडात ते एकमेव प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार आहेत. मात्र आता त्यांच्याच जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांच्या वकिलांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. आरोपी टोळीतील इतरांकडून शिवम यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली होती. त्यामुळे आता त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं.
वनराज आंदेकर यांची हत्या घरगुती कलहांसह टोळी युद्धातून देखील झाली. या प्रकरणात आत्तापर्यंत वनराज यांची बहिण, दाजी यांच्यासह गुंड सोमनाथ गायकवाड आणि इतर 19 आरोपींना अटक झाली आहे. तर आठ पिस्तूल, 13 काडतुसांसह सात दुचाकी आणि एक चार चाकीही जप्त केलीये. तर या प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या प्रत्येकावरच कारवाई होईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तर आंदेकर यांच्या वकिलांच्या मागणीनुसार आता शिवम आंदेकर यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलंय.