पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. अशातच एक अतिशय धक्कादायक प्रकार पुण्यातील वाघोलीत घडला आहे. तुम्ही चालवत असलेली कार चोरीची आहे असं सांगून निर्जन स्थळी नेले. एवढ्यावरच न थांबता या आरोपींनी या इसमाची कार देखील पळवून नेली.
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाघोली परिसरात शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सचिन सुधाकर टिळे (वय, ४७) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. टिळे हे अहमदनगर येथील कंपनीतून काम संपून वाकड येथील आपल्या घरी जात होते. त्याचवेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पुणे नगर रोडवर त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाल्याने ते पंक्चर काढण्यासाठी गॅरेज शोधत होते. त्याचवेळी वाघोलीतील कान्हा मेडल्ससमोर जात असताना एका कारने टिळे यांची कार अडवली. त्याचबरोबर त्यांच्याजवळ येऊन तुम्ही चालवत असलेली कार चोरीची आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर पोलीस चौकीला चला, असं म्हणत दमदाटी करून दोन इसम टिळे यांच्या कारमध्ये बसले.
पुढे थोडे अंतरावर या दोघांनी टिळे यांचा फोन काढून घेतला. त्यानंतर कार खराडी रोडने आव्हाळवाडी, मांजरी, कोलवडी, थेऊर मार्गे गणेश नगर खामगाव येथील निर्जन स्थळी नेली. आजूबाजूला लोकवस्ती नसून केवळ शेती असल्याचे पाहून रात्री अडीचच्या सुमारास टिळे यांना गाडीतून खाली उतरवले. व स्वतः त्यांची कार घेऊन पसार झाले. त्यानंतर टिळे यांनी पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी फिर्याद दिली. या प्रकरणी दोन अज्ञात इसमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मराठी भाषिक असून यातील एक 40 ते 45 वर्षांचा असून दुसरा इसम हा 30 ते 35 वर्षांचा असल्याची माहिती टिळे यांनी दिली. याच आधारावर पोलीस सध्या तपास करत आहेत.