बेवारस नवजात बाळाला महिला पोलिसांनी पाजलं दूध; आई-वडिलांचा शोध घेताना समोर आली धक्कादायक माहिती
बुलढाणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाणा येथील पोलीस ठाण्याजवळ एक दिवसाचं नवजात बाळ मोठमोठ्याने रडत असलेलं महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांना दिसलं. हे बाळ भुकेने व्याकुळ होऊन रडत असल्याचं महिला पोलिसाला लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या बाळाला स्वतःचं दूध पाजण्याची परवानगी मागितली.
अधिकाऱ्यांनीही तात्काळ या बाळाला दूध पाजण्याची परवानगी दिली. पंधरा-वीस मिनिटं दूध पिल्यानंतर हे बाळ गाढ झोपी गेलं. मात्र हे बाळ नेमकं कोणाचं आहे ? पोलीस स्टेशनच्या बाहेर या बाळाला का सोडण्यात आलं ? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मात्र तपासातून जी माहिती समोर आली ती मन हेलावून टाकणारी आहे.
नेमकं प्रकरण काय ?
बुलढाण्यातील ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली. चाळीशीतील एक जोडपं बुलढाण्यातील अनाथआश्रमात या नवजात मुलीला घेऊन आलं. अनाथाश्रम प्रशासनाला त्यांनी ‘हे बाळ एका वेड्या बाईकडे पाहिलं होतं. जर हे बाळ तिच्याकडे राहिलं तर ते मरून जाईल. म्हणून तिच्याकडून गुपचूप हे बाळ घेऊन आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तुम्ही या बाळाला इथे ठेवून घ्या’, अशी विनंती केली. मात्र अनाथ आश्रम आणि त्यांना याबाबतीत पोलिसांना माहिती देण्यास सांगितलं. मात्र पोलिसांना माहिती न देण्याच्या विचारात हे दोघेही होते.
दिवसभर हे बाळ त्यांच्याजवळच होतो. पोलिसांना माहिती द्यावी की नको या द्विधा मनस्थितीत ते होते. त्यातच हे बाळ रडू लागलं. भुकेने व्याकुळ झालं तेव्हा या जोडप्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणं गाठलं. अनाथ आश्रमात सांगितलेली गोष्ट एसएचओ नरेंद्र ठाकरे यांना सांगितली. त्यांनी लोणार पोलीस ठाण्याचे अधिकारी निमेश मेहेत्रे यांना याबाबत माहिती दिली. ज्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांनी या जोडप्याची कसून चौकशी केली असता हे नवजात बाळ म्हणजे त्यांची नात असल्याचं उघड झालं. त्यांच्या अल्पवयीन मुलीचे एका मुलाशी प्रेम संबंध होते. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. व त्याच मुलीची ही मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तात्काळ या मुलीच्या वडिलांचा शोध घेतला असून एका मध्यवयीन इसमाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळाचा सांभाळ कोण करणार?
दरम्यान बुलढाणा पोलीस प्रशासनाने या नवजात मुलीला शासकीय रुग्णालयात पाठवले असून तिची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांच्या उपचाराखाली तिला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. या बाळाला पंधरा दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. दरम्यान या मुलीला दूध पाजणाऱ्या पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनाही या मुलीचा लळा लागल्याने त्यादेखील तिला पाहण्यासाठी रुग्णालयात जात असतात. या घटनेमुळे डुकरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.