पुण्यातील खराडी भागांमध्ये असलेल्या नदीपात्रात 27 ऑगस्टच्या सकाळी हात पाय आणि डोकं नसलेलं महिलेचं विवस्त्र धड काही कामगारांना नदीच्या पाण्यात तरंगताना दिसलं. चंदन नगर पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आणि चंदन नगर पोलिसांसह गुन्हे शाखा ही कामाला लागली. या मृतदेहावर कोणताच पुरावा नसल्यामुळे ओळख पटवणं अवघड होतं, मात्र पाच दिवसांच्या तपासानंतर अखेर या निर्घृण हत्येचं गुढ उलगडलं आहे.
मृतदेह नेमका कोणाचा ?
हा मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा आहे. ही महिला पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास होती. ती राहत असलेली छोटीशी खोली तिच्या नावावर होती. मात्र सकीनाचा भाऊ असलेल्या अश्फाक आणि त्याची पत्नी हमिदा यांचा सकीनाच्या खोलीवर डोळा होता. सकीनाच्या नावावर असलेली खोली आपल्या नावावर व्हावी, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेकदा सकीनाला या घरातून निघून जायला सांगितलं, मात्र तिने ते ऐकलं नाही आणि याच छोट्याशा खोलीच्या हव्यासापोटी सकीनाचा सख्खा भाऊच बनला पक्का वैरी…
सकीनाची खोली मिळवण्यासाठी तिच्याच भावाने बायकोच्या मदतीने सकीनाचा खून केला. ओळख लपवण्यासाठी आपल्या घरातच मृतदेहाचे अनेक तुकडे केले. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीला वाढलेल्या पाण्याचा फायदा घेत मृतदेहाचे तुकडे संगमवाडीच्या नदी पात्रात फेकून दिले. आणि शेजाऱ्यांना सकीना गावी गेली असल्याची खोटी माहिती दिली. मात्र याच शेजाऱ्यांना अश्फाक आणि हमीदा यांच्यावर संशय आल्याने त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं. या पोलीस ठाण्यात त्यांनी सकीनाबद्दलची तक्रार दाखल केली. आणि त्यामुळेच या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी मदत झाली.
मारेकरी भाऊ- वहिनी ताब्यात
हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जवळपासच्या परिसरातील बेपत्ता महिलांचा शोध सुरू केला. त्याचवेळी पाटील इस्टेट मधल्या काही नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतरच तपासाची सूत्र फिरली. आणि अखेर पोलीस या मारेकरी भाऊ आणि वहिनीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.