अकोला : अकोला जिल्ह्यातून (Akola News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा बनाव जन्मदात्या आईने केला मात्र आता वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे.या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतले आहे. अकोला शहरातील बलोदे लेआऊट या ठिकाणी ही घटना घडली आहे. किशोरी रवी आमले (वय 5) असं मृत मुलीचं नाव असून विजया आमले असे आरोपी आईचे नाव आहे. या संदर्भात वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आईने आपल्या पोटच्या लेकीची नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाकाला चिमटा लावल्याने चिमुकल्या किशोरीचे प्राण गेल्याचा बनाव रचण्यात आला होता. किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. मात्र किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. आता या प्रकरणात किशोरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचा केलेला देखावा समोर आला. तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. जून महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. आता किशोरीची आई विजया आमले हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि तिला ताब्यात घेण्यात आले.
Bangalore : मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
काय घडलं होतं 2 जून रोजी?
2 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता कामावरुन वडील रवी हे घरी जेवणाकरीता आले. किशोरी ही घरी ट्युशनवरून आलेली होती. त्यानंतर किशोरीने सोबत जेवण केले आणि काही वेळ रूममध्ये खेळली . पुन्हा थोड्या वेळाने वडील कामाकरिता घरून दुपारी निघाले. या दरम्यान, पत्नी विजया हिचा फोन आला आणि तिने त्यांना सांगितले की, मी घरातील कामे करीत असताना किशोरी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली होती, कामे संपल्यावर जेवणासाठी किशोरी हिला झोपेतून उठविले, परंतु किशोरी ही झोपेतून उठत नाही. तुम्ही लवकर घरी या असे म्हणाली. लगेच मित्र वैभव हांडे याला फोन केला अन् रवी आमले घरी गेले. किशोरी हिला शासकीय रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या संदर्भात रवी आमले यांनी विजया हिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, किशोरी ही पलंगावर ओले कपडे घराबाहेर वाळच घालण्याकरीता असलेल्या चिमट्यानं खेळत होती. कामे झाल्यानंतर घरात पाहिले असता किशोरीने नाकाला चिमटा लावलेला होता आणि किशोरी ही काहीच हालचाल करीत नव्हती, असे तिने सांगितले.हि सर्व घटना घडली तेव्हा तेव्हा किशोरीची आई ही एकटीच घरी होती. त्यामुळे किशोरीच्या वडिलांना तिच्यावर संशय आला. यानंतर किशोरीच्या वडिलांनी आरोपी आईविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलीस कर्मचारी करंदीकर व आकाश राठोड यांनी काम पहिले.