पत्नीने राहत्या घरात गोड बोलून पतीला दारू पाजली, त्याच्या आवडीचे मासे खाऊ घातले आणि नशेत असलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशात ग्वालियर शहरात घडली. तर या गुन्हा प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ग्वालियरमधील गिरवाई येथे राहणाऱ्या लोकेंद्र कुशवाहा यांचा त्यांच्याच राहत्या घरात मृतदेह आढळला. लोकेंद्र यांचे वडील घरात आल्यानंतर त्यांना मुलगा लोकेंद्र याचा मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांची सून घरात नव्हती. मात्र मुलाच्या मृत्यूचं दुःख इतकं होतं की त्यांनी इतर कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. मुलाच्या मृत्यूची खबर त्यांनी पोलिसांना दिली. नातेवाईकांना संपर्क साधून अंत्यविधीसाठी बोलावून घेतलं. मात्र त्याच वेळी लोकेंद्र यांचे नातेवाईक आणि मित्र अंत्यविधीसाठी जमले असताना नातेवाईकांची नजर मृतदेहाच्या गळ्यावर पडली. त्यांच्या गळ्यावर अनेक जखमा दिसत होत्या. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी पोस्टमार्टम साठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लोकेंद्र यांची गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झालं.
मयताची पत्नी पसार
लोकेंद्र यांचा मृत्यू होण्याआधी काही वेळ आधी त्यांची पत्नी अंजली कुशवाहा ही घरात होती. काही वेळाने तिचा मावस भाऊ देखील घरी आला होता. त्यानंतर अचानक हे दोघेही गायब झाले आणि लोकेंद्र यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे पोलिसांना लोकेंद्र यांच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी लोकेंद्र यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येमागचं कारण काय ?
आरोपी पत्नी अंजलीने सांगितलं की, ‘तिचे लोकेंद्र यांचा मित्र गौरवसोबत अनैतिक संबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी लोकेंद्र यांना दोघांच्या नात्याची कुणकुण लागल्याने पतीने गौरवचं घरी येणं बंद केलं’, याच गोष्टीचा राग अंजलीच्या मनात होता. या रागातूनच तिने आपल्या भावाच्या मदतीने पतीचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंजली, मावस भाऊ आणि अंजलीचा प्रियकर गौरवला अटक केली आहे.