पुणे आणि पुण्यातील खड्डे हे एक समीकरणच बनलय. त्यामुळे पुण्यातील रस्ते हे रस्ते नसून मृत्यूचे सापळे बनलेत. आणि याच सापळ्यात अडकल्या खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु… त्यामुळेच पुण्यातल्या या रस्त्यांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. मात्र यानंतरही प्रशासनाला खरंच जाग येईल का ? आणि रोज या रस्त्यांवरून ‘मौत का खेल’ खेळून जगत असलेल्या पुणेकरांचं आयुष्य या खड्ड्यांनी खडतर केलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या पुणे दौऱ्यावेळी त्यांना खड्ड्यांमुळे नाहक त्रास झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पोलीस प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी ही समस्या येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केलेत. 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याच्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावे असं पत्र पोलिस प्रशासनाने पुणे मनपा आयुक्तांना पाठवलंय आणि त्या अनुषंगाने मनपा कामाला लागली आहे. मात्र केवळ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी यांच्यासाठीच खड्डे बुजवणार का ? पुण्यात राहणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी, सुरक्षेसाठी खड्डे बुजवले का जात नाही ? असा प्रश्न पुणेकरच उपस्थित करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर गाड्या चालवणारे पुणेकरही व्हीआयपीच आहेत, असं मानून प्रशासनाने खड्डे दुरुस्ती मनावर घ्यावी, एवढीच सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.
खड्ड्यांसाठीचं ॲपही खड्ड्यात ?
कोट्यावधींचा निधी वेळोवेळी खर्च करूनही पुण्यातले रस्ते खड्डे मुक्त करणं महानगरपालिका प्रशासनाला अजूनही जमलेलं नाही. एवढेच काय तर खड्ड्यांसाठी बनवण्यात येणार ॲपही खड्ड्यातच गेलं की काय असा प्रश्न निर्माण होतोय. पुण्यातील रस्त्यांवर खड्डा दिसल्यास त्याची तक्रार पुणेकरांना एका क्लिकवर करता यावी यासाठी एक ॲप विकसित करण्याची घोषणा महानगरपालिकेने केली. निधीची तरतूदही झाली. मात्र सहा महिन्यांपासून हे ॲप तयार करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ॲप बद्दलची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेकडून जाणून घेऊन तसं मोबाईल ॲप विकसित केलं आणि नागरिकांच्या सेवेत आणलं सुद्धा… मात्र पुणे महानगरपालिकेला खड्डे बुजवायला आणि खड्ड्यांचा ॲप विकसित करायला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.