सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील पहिलीच्या वर्गात शिकणारी आदिती चौगुले 2 ऑगस्ट रोजी शाळेतून बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडला आहे. श्रीपूर येथील नीरा कालव्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील भाऊसाहेब राऊत विद्यामंदिरात इयत्ता पहिलीत शिकणारी आदिती गणेश चौगुले ही 2 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुट्टीमध्ये अचानक गायब झाली होती. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास या चिमुकलीचा मृतदेह श्रीपूरकडे जाणाऱ्या निरा कालव्यामध्ये आढळून आला. आदितीने 2 ऑगस्ट रोजी शाळेतून 1.30 ते 2.30 च्या दरम्यान जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मैत्रिणीबरोबर शाळेच्या कट्ट्यावर जेवण केले. त्यानंतर शाळेची घंटा वाजल्यानंतर आदितीने मी घराकडे जाते असे सांगून गेली. ती माघारी परतलीच नाही.
आदितीच्या शिक्षकाकडून तक्रार दाखल
आदिती गायब झाल्याने तिच्या कुटुंबायांनी सगळीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र अदितीचा कुठंच ठावठिकाणा लागत नसल्याने सदर मुलीस अज्ञात आरोपीने कशाचं तरी अमिष दाखवून तिला फूस लावून पळून नेल्याची फिर्याद अदितीचे शिक्षक सोमनाथ पांडुरंग सरगर यांनी दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी वेळापूर पोलीस स्टेशनला दिली होती.
2 दिवसांनी आढळला मृतदेह
तक्रार दाखल होताच वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भुरे पाटील यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु करण्यात आला. घटनास्थळी वेळापूर पोलीस तळ ठोकून वेगवेगळ्या अँगलने सलग दोन दिवस आदितीचा शोध घेत होते. यादरम्यान शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास निरा कालव्यामध्ये एका मुलीचे प्रेत आढळून आले. याची माहिती मिळताच बागाव यांनी पोलीस कर्मचारी आणि मुलीचे नातलग यांच्या समवेत जाऊन कालव्याजवळ पाहणी केली.यानंतर सदरचे प्रेत हे आदितीचे असल्याचे तपासात समोर आले.
शवविच्छेदन अहवालात मोठा खुलासा
वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संजय रेगुडे, जनार्दन करे, गणेश क्षीरसागर, श्रीपूर आउट पोस्टचे पोलीस चंदनशिवे आदींनी प्रेत पाण्यातून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी अकलूजला पाठवले. डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला असल्याचे सांगितले. आदिती ही दत्तनगर खंडाळी येथे वेगाने वाहणाऱ्या निरा कालव्यामध्ये हातपाय धुताना घसरून पाण्यात पडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण गावावर पसरली शोककळा
आदिती ही आई-वडिलांच्या कौटुंबिक वादामुळे आपल्या आई व लहान बहिणींसह मामाच्या गावी मौजे दत्तनगर या ठिकाणी राहत होती. घरापासून जवळच असलेल्या शाळेमध्ये ती पहिलीमध्ये शिकण्यास होती. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या आदितीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने खंडाळी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.