Nashik News

Nashik News : चिमुकला अचानक झाला बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध केली असता समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरले !

5153 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका 6 वर्षीय चिमुकल्याचा छोट्याशा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केदा रवींद्र नामदास असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

काय घडले नेमके?
नाशिक जिल्ह्यातील खामखेडा शिवारात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून वास्तव्यास असलेल्या पंडित नामदास कुटुंबियांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. दोन मुलं सुना आणि नातवंडांसह हे कुटुंबीय वाड्यावरच वास्तव्यास असते. पाऊसच नसल्याने गेल्या एक दीड महिन्यांपासून नामदास कुटुंबाचा मेंढ्यांचा मुक्काम मांगबारी घाटातील नवशा गणपती मंदिराच्या पूर्वेकडील संजय काशिनाथ मोरे यांच्या शेतात होता. काल दिनांक 7 रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने हे कुटुंबीय मेंढ्यांच्या वाड्या शेजारील आपल्या पालात बसून होते. दुपारी तीन वाजेपासून जोरदार पाऊस झाल्याने या चिमुरड्यासह घरातील इतरही चार ही मुलं आणि कुटुंबीय आडोशाला पालात बसलेले होते.

पाऊस उघडल्यानंतर लहान मुले घराशेजारीच खेळत असताना पालाजवळ तसेच मेंढ्यांकडे केदा आढळून न आल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कुठेच आढळून न आल्याने त्यांनी शेतातील खड्ड्याकडे जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी पाण्यात बुडालेला दिसला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा त्याच्यावर खामखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!