नाशिक : दिंडोरी तालुक्यातील (Nashik News) पिंपळनारे येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. अखेर त्याचा मृतदेह एका विहरित आढळून आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नाशिकच्या दिंडोरी पोलीस ठाण्यात 27 सप्टेंबर रोजी पिंपळनारे गावातील 35 वर्षीय उमेश खांदवे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर एका वीस वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून ती मुलगी काही महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं होते. संशयिताला तपासकामी त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले असता तेथून परत येतांना नाशिकच्या गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने उमेश खांदवे पोलीस वाहनातून खाली उतरला आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन फरार झाला होता.
या प्रकरणातील पीडित मुलीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी संशयित उमेश खांदवे यास अटक केली होती. मात्र त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. यानंतर वरिष्टांनी या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांना तडकाफडकी निलंबित केले होते.