Parbhani News

प्रियकराला फिरायला नेऊन साथीदाराच्या मदतीने केला खून; अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

225 0

अनैतिक संबंधातून प्रेयसीनेच प्रियकराची साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. हत्या केल्यानंतर प्रियकराचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला होता. याचा पोलीस तपास करत असताना हत्येचा प्रकार उघड झाला आहे.

मृत तरुणाचे नाव अर्जुन दिलीप रोडगे (वय-२८) असून त्याचा मृतदेह परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील यज्ञेश्वर मंदिराजवळील जंगलातील रस्त्यावर आढळून आला होता.‌ मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रोडगे हा दोन जुलैपासून बेपत्ता होता. या संदर्भातली तक्रार त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यांनी शेलू पोलिस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता अर्जुनचे गावातीलच एका 29 वर्षीय महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली. शेलू पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

मृत अर्जुन व त्याची प्रेयसी फिरण्यासाठी लोणार सरोवर परिसरात आले. सरोवरच्या गेटवर त्यांनी रजिस्टर मध्ये एन्ट्री देखील केली. त्यानंतर आत जाऊन दर्गा रोड जवळ असलेल्या एका झाडाखाली दोघे बोलत बसले. त्याचवेळी दबा धरून बसलेला प्रेयसीचा साथीदार आला. त्याने अर्जुनचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह नेऊन जंगलातील दाट झाडांमध्ये फेकून दिला. त्यानंतर आरोपी महिला दुचाकीने गावाच्या दिशेने निघाली मात्र अलीकडच्याच गावामध्ये दुचाकी सोडून तिथून आपल्या गावी परतली.

अर्जुन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि प्रेयसीचे बिंग फुटले. दरम्यान या महिला आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी नेले होते. त्यावेळी तिने ही हत्या कुठे केली आणि अर्जुनचा मृतदेह कुठे फेकून दिला याबाबत स्वतः माहिती दिली. याप्रकरणी आरोपी महिला आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आहेलाजी डुकरे (वय-२४, रा. खडुळा, ता.पाथरी परभणी) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!