राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत असताना सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीत महाविद्यालयाच्या बाहेर भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. तिच्यावर सपासप वार केले ज्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे हे वार तिच्याच पतीने केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेले माहितीनुसार, प्रांजल काळे असे हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर तिच्यावर हल्ला तिच्याच पतीने म्हणजेच संग्राम शिंदे याने केला आहे. प्रांजल आणि संग्राम यांचा सहा महिन्यापूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. याच वादातून संग्रामने हा हल्ला केला. प्रांजल आज महाविद्यालयात आली होती. महाविद्यालयातून बाहेर पडतात भर रस्त्यात तिच्यावर संग्रामने चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान आरोपी पतीने हल्ला करताच घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.