रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) भोस्ते घाटामध्ये कंटेनर, टेम्पो आणि सुमो कार या तीन वाहनांनी एकमेकांना पाठीमागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या भीषण (Mumbai Goa Highway) अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही तिन्ही अपघातग्रस्त वाहने गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. महामार्गावर पोहोचताच घाटाच्या अवघड वळणाच्या अगोदर टाकलेल्या मोठ्या गतिरोधकांमुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.
समोर निघालेली सुमो स्पीड ब्रेकर असल्याने अचानक थांबली आणि तिला पाठीमागून टेम्पोने, त्या टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातानंतर काही वेळ या लेन वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांमधील चालक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या पंधरा दिवसातील भोस्ते घाटातला हा चौथा मोठा अपघात असून याआधी देखील दोन टेम्पोचा अशाच प्रकारे एकमेकांना ठोकर देऊन अपघात झाला होता. त्यानंतर याच घाटात इतर दोन वाहनांचे देखील अपघात झाले होते. आणि आज पुन्हा एकदा याच ठिकाणी या घाटामध्ये तिहेरी वाहनांचा अपघात झाल्यामुळे हा घाट हा अपघातांचा घाट झाला आहे की काय? असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.