पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यातील वडगाव शेरी मध्ये दोन तरुणांवर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरु आहे. आरोपींचा शोधही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार वडगाव शेरी परिसरात घडला असून या ठिकाणी असलेल्या सत्यम सेरेनिटीमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. 27 वर्षीय फिर्यादी तरुण हे त्यांच्या चार- पाच मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. अचानकपणे आठ ते दहा जण चार-पाच गाड्यांवरून फिर्यादींच्या जवळ आले. त्यांनी थेट शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. ‘तू विश्वजीत बरोबर का राहतोस ? त्याच्याबरोबर राहिलास तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत मारहाण करताना ‘विश्व्या कुठे आहे?’ नाही अशी विचारणा करत फिर्यादींवर कोयत्याने हल्ला करण्यात आला.
फिर्यादीचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या मित्राने मध्ये हात टाकला असता त्यांच्यावर देखील वार करण्यात आले. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्याबरोबर असलेला 19 वर्षीय तरुण देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.