कोची: केरळमधील एका हसत्या खेळत्या कुटुंबाने अचानक आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इर्नाकुलमच्या वालिया कदमाक्कुडी परिसरातील राहत्या घरी त्यांचे मृतदेह सापडले. जोडप्यानं आधी मुलांना संपवून मग गळफास घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटदेखील सापडली.
काय आहे नेमके प्रकरण?
निजो (40), त्याची पत्नी शिल्पा (30), त्यांची मुलं अबेल (7) आणि ऍरॉन (5) अशी मृतांची नावं आहेत. ऑनलाईन लोन अॅपमुळे कुटुंबाचा शेवट झाल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. शिल्पानं ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. मात्र कर्जाची परतफेड करण्यात तिला अपयश आलं. त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या. अॅपसाठी काम करणाऱ्यांनी महिलेचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवले. महिलेच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज सापडले आहेत.
अशाप्रकारे घटना आली उघडकीस
निजोच्या आईनं आणि मैत्रिणीनं सर्वप्रथम चौघांचे मृतदेह पाहिले. निजो मोबाईल कॉलला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे निजोची आई त्याच्या घरी गेली. तिनं दार ठोठावलं. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता या चौघांचे मृतदेह आढळून आले.