दौंड (daund police station) तालुक्यातल्या कडेठाण गावामध्ये एका बिबट्याची खुनाच्या (leopard case) आरोपातून चक्क निर्दोष सुटका झालीये. पोलिस आणि वन विभागानं या प्रकरणाची कसून तपासणी केल्यामुळे बिबट्या दोषमुक्त झालाय. कोणत्या वातावरणात कोण कशी पोळी भाजून घेईल हे सांगता येत नाही. काहीसा असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कडेठाण गावात घडलाय.एका महिलेच्या मृत्यूनं दौंड तालुक्यातील कडेठाण गाव हादरून गेला होतं…लताबाई धावडे असं या महिलेचं नाव.. उसाच्या शेतात काम करणाऱ्या लताबाईंवर बिबट्यानं हल्ला केला आणि त्या मरण पावल्या अशी गावात चर्चा सुरू झाली. अनिल धावडे यानं लताबाईंच्या मृत्यूची फिर्याद पोलिसात दिली. आपल्या फिर्यादीत त्याने लताबाईंचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचं नमूद केलं. 7 डिसेंबर 2024 रोजी कडेठाण गावात धावडे यांच्या शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत लता धावडे यांचा मृतदेह आढळला त्याच्या जवळच रक्ताने माखलेला दगडही आढळून आला. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पुतण्या अनिल धावडे व इतरांनी केला. ही घटना वन विभागाला कळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना धावडे यांनी तुमच्यामुळेच आमच्या घरातील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. असं म्हणत धारेवर धरलं.
वन विभागाने घटनास्थळी नऊ ट्रॅप कॅमेरे थर्मल ड्रोन लावून तपासणी केली असता या ठिकाणी बिबट्या आढळून आला नाही. त्यानंतर बिबट्याचा हल्ला तपासण्यासाठी मयत महिलेच्या शरीरातील काही स्त्राव रक्ताचे नमुने नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले… तोपर्यंत इकडे आरोपी धावडे हा सतत त्यांना वनाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून आर्थिक स्वरूपात तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करत होता… लता धावडे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे तो सातत्याने भासवत होता. मात्र वनविभागाला ही संशय आला त्यामुळे त्यांनी नागपूर येथील प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच नुकसान भरपाई देण्याची ठरविले… वैद्यकीय अहवाल आल्याच्या नंतर बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. त्यानंतर फिर्यादी आणि मयत लक्ष्मीबाई बबन धावडे यांचा पुतण्या अनिल पोपट धावडे आणि त्याचा शेतकरी सतीलाल वाल्मीक मोरे यांनी उसाच्या शेतात तोंड दाबून त्यानंतर महिलेचा दगडाने मारून खून केल्याचं पुढं आलं. पोलिसांच्या आणि वनविभागाच्या तपासामुळे अखेर या कोणाला वाचा फुटली आणि या खून प्रकरणातील खरे आरोपी गजाआड गेले तर बिबट्याची निर्दोष मुक्तता झाली.