बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. धनंजय मुंडेंना याच मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला. दरम्यान याच विषयावर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका सभागृहात मांडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार आहे. तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जालना येथील मारहाण प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे जखमी व्यक्तीशी संवाद साधला होता. तसेच सरकार तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका असं सांगून धीर दिला होता.
दरम्यान जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्याशी संवाद साधला. अजय कुमार हे स्वतः व पालकमंत्री पंकजा मुंडे या त्यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्व प्रकार अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. यामधील एक ही गुन्हेगार सुटता कामा नये मोक्का कायदा लागू करण्याची प्रक्रिया गृह- विभागाच्या माध्यमातून आम्ही करू. या प्रकरणी सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. याबद्दल गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी मी स्वतः बोलेन असं सभागृहात एकनाथ शिंदे म्हणाले.