अहमदनगर : राज्यात अपघाताचे (Ahmednagar Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अहमदनगर जिल्ह्यातून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याण -निर्मळ महामार्गावरील करंजी घाटाच्या पायथ्याला ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान आयशर ट्रक आणि दुधाच्या टॅंकरची समोरा-समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहानांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आयशर ट्रक कट्टे घेऊन पैठणवरून अहमदनगरच्या दिशेनं निघाला होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे जात होता. करंजी घाट संपल्यानंतर थोड्याच अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालक जावेद मन्सुर शेख आणि टॅंकर चालक शिवाजी नानासाहेब भवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.