दारू पिऊन धिंगाणा करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. बारमध्ये झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या गोट्या ऊर्फ अमोल शेजवळ (वय ३४, रा.धायरी फाटा, सिंहगड रोड) याचा खून झाला आहे. याप्रकरणी आकाश कुलकर्णी याच्यासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिंहगड रोडवरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बार बाहेर घडली. मयत अमोल शेजवळ हा आपल्या मित्रांबरोबर या बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. दारू पिल्यानंतर नेहमीप्रमाणेच अमोलने बार मध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. तो मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करू लागला. त्याने शेजारच्या टेबलवर बसलेल्या ग्राहकांना देखील त्रास दिला. त्यामुळे क्लासिक बारमध्ये भागीदारी असलेला मालक आकाश कुलकर्णी याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत असलेला अमोल काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी आकाशवाणी अमोल यांच्यात जोरदार वाद झाले. अखेर बार मधील बाउन्सर्सनी अमोल आणि त्याच्या मित्रांना बार बाहेर काढले. त्यावेळी अमोलने बाउन्सर्स बरोबरही वाद घातले. याच रागात आकाश कुलकर्णी याने बारशेजारी असलेल्या गॅरेज मधील हातोडा आणून अमोलच्या डोक्यात मारला. हा वार इतका गंभीर होता की अमोलचा जागेत मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हे दाखल केले. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.