Video Crime

VIDEO: दिव्यांग व्यक्तीला पोलिसांकडून बेदम मारहाण

725 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एका दिव्यांगाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता उत्तर प्रदेश पोलीस दलाचे दोन कर्मचारी एका दिव्यांग तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण झालेली व्यक्ती त्याची ट्रायसायकल घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला मारहाण केली आहे. ती व्यक्ती तिथून जात असताना दोन्ही पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून मारहाण केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस ट्रायसिकलवर बसलेल्या एका दिव्यांग तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी पाणी मागितल्याने दिव्यांग व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत समाजवादी पक्षाने योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय घडले नेमके?
रात्रीच्या सुमारास सचिन सिंह नावाचा दिव्यांग व्यक्ती रस्त्याने परतत होता. त्यावेळी त्याने पोलिसांना पाणी मागितले. मात्र यामुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. “मी रात्री 11 च्या सुमारास ढाब्यावरून जेवण करून परतत होतो. बायपास वरून येताना वाटेत एक कासव दिसले, वाटले ते रस्त्यावरच राहिले तर मरेल, मी ते उचलले आणि एका व्यक्तीच्या मदतीने एका डबक्यात टाकले. त्यानंतर माझ्या हाताला खूप घाण वास येत होता. तेव्हा तिथे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी हात धुण्यासाठी बाटलीतील पाणी मागितले. त्यावरुन ते संतापले आणि त्यांनी मला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली,” असे पीडित तरुणाने सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहून उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!