मुंबई : देशात सध्या गुन्हेगारीच्या (Crime News) प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. प्राथमिक दृष्ट्या असे वाटले हे प्रकरण खंडणीशी रिलेटेड असेल पण जेव्हा आरोपींची चौकशी केली तेव्हा वेगळेच कारण समोर आले.
कानपूरमधल्या एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा कुशाग्रची हत्या करण्यात आली आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. सोमवारी संध्याकाळी कुशाग्र कोचिंगसाठी घरातनं बाहेर पडला तो परत आलाच नाही. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांना 30 लाख रुपयांच्या खंडणीचे पत्र मिळाल्यावर त्यांना धक्का बसला. याबाबत तातडीने पोलिसांत तक्रार करण्यात आली. पण मंगळवारी सकाळी एका महिला शिक्षिकेच्या घरातनं कुशाग्रचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी महिला शिक्षिकेसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
कुशाग्रचा मृत्यू सोमवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास झाला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचे तपासात समोर आले. यादरम्यान पोलिसांनी CCTV फुटेज तपासले. कुशाग्र त्याच्या मर्जीनं शिक्षिकेच्या घरी गेला होता. सीसीटीव्हीत कुशाग्र महिलेच्या घरात जाताना दिसला. त्याचवेळी शिक्षिका रचिता आणि तिचा बॉयफ्रेंड प्रभात हे दोघं स्टोअर रूममध्ये जाताना दिसले. सुमारे अर्ध्या तासाने हे दोघं रूममधून बाहेर पडले. कुशाग्र आतच होता. याचदरम्यान त्याची हत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे.
त्यानंतर प्रभात कुशाग्रची स्कूटी घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसला. प्रभात आणि कुशाग्रचा मित्र आर्यन स्कूटीवरुन कुशाग्रच्या घराजवळ गेले आणि त्यांनी खंडणी मागणारे पत्र त्याच्या घरात टाकले. या दरम्यान स्कूटीचा नंबर देखील बदलण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिका रचिता, तिचा बॉयफ्रेंड प्रभात आणि आर्यनला ताब्यात घेतले. पोलिसांनी कुशाग्रची ट्युशन टीचर रचिता आणि त्याच्या बॉयफ्रेंडची चौकशी केली. पहिल्यांदा या दोघांनी पोलिसांची दिशाभूल करणारी माहिती दिली. पण पोलिसांनी धाक दाखवताच दोघांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. प्रेमप्रकरणातून कुशाग्रची हत्या करण्यात आली असल्याचे त्यांनी कबूल केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.