बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक वळण घेतले आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांची जाळपोळ केली जात आहे. काही नेत्यांची घरे, कार्यालये जाळली जात आहेत. तर दुसरीकडे याच आरक्षणासाठी लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. नुकतीच एक बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडच्या पाटोदा तालुक्यातील गांधनवाडीचे ४५ वर्षीय शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. तसेच बाळू धारीबा यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.