‘अशा महिला असेपर्यंत असे मृत्यू होत राहतील’, असं सुसाईड नोटमध्ये लिहून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयत तरुण हा डिलिव्हरी बॉय असून ही घटना चेन्नईतील कोलाथूरमध्ये घडली. या घटनेची सध्या तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्या मागचं कारण म्हणजे या तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट.
नेमकं प्रकरण काय ?
आत्महत्या केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव पवित्रन आहे. तर त्याच्या आत्महत्येला एक महिला ग्राहक जबाबदार असल्याचे बोलले जात आहेत. पवित्रन हा तरुण बी. कॉम चे शिक्षण घेत होता. मात्र त्या जोडीला तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून घरातील खर्चासाठी पैसे कमवत होता. 11 सप्टेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. त्यावेळी कोराट्टूरमधील एका महिला ग्राहकाने ऑर्डर केली होती. पवित्रन ही ऑर्डर घेऊन लागलीच निघाला. दिलेल्या पत्त्यावर पोहोचला मात्र त्याला ग्राहकाचे घर सापडत नव्हते. घर शोधण्यासाठी बराच वेळ लागल्याने ऑर्डर पोहोचवायला उशीर झाला.
पवित्रन हा ग्राहक महिलेच्या घरी पोहोचताच या महिलेने त्याच्याशी अरेरावीच करत वाद घातले. उशिरा आल्यामुळे तिने त्याला चांगलेच सुनावले. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही तर तिने फूड डिलिव्हरी ॲपवर त्याची तक्रारही केली. त्यानंतर पवित्रन देखील चिडला. रागाच्या भरात त्याने महिलेच्या घरावर दगड फेकला. ज्यामुळे तिच्या खिडकीची काच फुटली. त्यामुळे समतापलेल्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात पवित्रनची तक्रार केली.
पवित्रनने घेतला गळफास
महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर पवित्रन नाराज झाला. त्याला मानसिक त्रास झाला. त्यातूनच त्याने 18 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी पोलिसांना पवित्रनने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. ‘डिलिव्हरी देण्यासाठी गेल्यानंतर त्या महिलेने माझ्याशी वाढ घातले, मला शिवीगाळ केली. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो. अशा महिला असेपर्यंत असे मृत्यू होत राहतील’, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं. त्यामुळे त्याच्या मृत्यूचं कारण महिला ग्राहकच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या महिलेवर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.