दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी जेईई आणि नीट सारख्या परीक्षा पास करण्यासाठी मोठमोठ्या कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेतात. मात्र हे प्रवेश घेताना कोचिंग क्लास बद्दल, तिथल्या शिक्षक आणि संचालकांबद्दल संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. कारण कोचिंग क्लास संचालकाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात घडला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये “फिटजी” नावाचे जेईई कोचिंग क्लासेस आहेत. या क्लासेस मध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यासाठी पालकांनी क्लासची लाखो रुपये फी भरली होती. मात्र अचानक हे कोचिंग क्लास बंद पडल्याने या पालकांना आणि विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
फिटजी कोचिंग क्लासेसचे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सेंटर आहेत. एक सेंटर पुण्यातल्या स्वारगेट जवळ असून दुसरं पिंपरी चिंचवड मध्ये आहे. या दोन्ही सेंटरमध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रवेश घेतला आहे. या क्लासची फी तब्बल अडीच लाख रुपये आहे. मात्र तरी देखील अनेक पालकांनी आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करत या ठिकाणी प्रवेश घेतले. एका पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील कोचिंग सेंटर बंद होणार असल्याचे सेंटरचे प्रमुख राजेश कर्ण यांनी अनौपचारिक रित्या सांगितले होते. कोचिंग मधील काही कर्मचाऱ्यांचे पगार दिले गेले नव्हते त्याचबरोबर जागेचे भाडे देखील भरलेले नव्हते. मात्र कोणालाही पुढची माहिती मिळायच्या आत विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी घेऊन हे कोचिंग बंद करून संचालक देखील फरार झाले आहेत. त्यामुळे लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिक्षण विभागाला या प्रकरणाची माहिती दिली असल्याचे चिंचवड पोलीस होण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.