खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार अल्ताफ मोहम्मद शेख आणि टोळीतील चार जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई
पुणे : खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखा वरील आरोपी अल्ताफ मोहम्मद शेख वय वर्षे 20 आणि त्याच्या टोळीतील चार साथीदारांवर खडकी पोलीस स्टेशन येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आज अल्ताफ शेख आणि टोळीतील चार जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे आणि अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा या उद्देशाने स्वतः आणि टोळीतील सदस्यांना सोबत घेऊन दखलपात्र गुन्हे करून टोळीची दहशत आणि वर्चस्व प्रस्थापित करून बेकायदेशीर मार्गाने हिंसाचाराचा वापर करून ही टोळी अगदी अल्पवयीन असल्यापासूनच संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असून या टोळीच्या अशा कृत्यांमुळे या परिसरामध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे आणि समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन 2022 या चालू वर्षातील ही 38 वी आणि एकूण 101 वी कारवाई आहे.
