राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर अनेक दिवसांपासून असूनही अद्याप त्यांचा पक्षप्रवेश रखडलेला आहे. मात्र याच एकनाथ खडसे यांच्याकडे असलेल्या सीडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकदा तुफान आलं आहे. खडसेकडच्या सीडी मध्ये नेमकं आहे तरी काय हा प्रश्न अनेकदा पडतो. त्यामुळे सीडी मध्ये नेमकं काय आहे याचं उत्तर आता खडसेंनी स्वतः दिलं आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजप नेत्यांवर टीका करताना, ‘त्यांच्याकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे आणि योग्य वेळ आल्यावर आपण ती सीडी बाहेर काढू’, असं विधान केलं होतं. मात्र, ही सीडी त्यांनी कधीही बाहेर काढली नाही. त्यामुळेच या सीडीमध्ये नेमकं काय होतं असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत खडसेंना विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी खळबळ जनक खुलासा केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, ‘त्यावेळी ते ईडी म्हणाले म्हणून मी सीडी म्हणालो. मी यमक जुळवलं. परंतु माझ्याकडे काही कागदपत्रं आणि व्हिज्युअल क्लिप होते. त्यात एका भाजप नेत्याचे मुलीसोबत चालणारे चाळे होते. हे चाळे कोण करत होतं त्यांचं नाव सांगणार नाही. मात्र ते मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील दाखवले. परंतु ते माझ्या मोबाईलमधून कुठं गेलं ? डिलिट कसं झालं हे मला देखील समजलेलं नाही. पण मी शपथ घेऊन सांगतो की माझ्याकडे क्लिप होती. माझी मुक्ताईवर श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो ते माझ्याकडे होतं.’
एवढेच नाही तर ती क्लिप ज्याने त्यांना दिली होती. त्या व्यक्तीला देखील लोकांनी मॅनेज केले. फ्लॅट दिला, पाच दहा कोटी दिले. त्यामुळे आता तो माणूस त्यांच्यासोबत असून दोन फ्लॅटसह 20-25 कोटींची प्राॅप्रर्टी त्याच्या नावावर आहे, असा धक्कादायक खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ती क्लिप नेमकी कोणाची आणि कोणी दिली यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.