बदलापूर मध्ये साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील स्वच्छता कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने अत्याचार केले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र अजूनही हादरलेला आहे. अक्षय शिंदे ला फाशी व्हावी ही मागणी सुद्धा केली जात आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज या पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले.
ही संपूर्ण घटना पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले होते. मात्र पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. अनेक वेळ तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून स्वतः पोलीस ठाण्यात पालकांसोबत भाव घेतली. पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी या पालकांची तक्रार दाखल करून घेतली. तब्बल 12 तासानंतर ही तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यानंतरही या कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर मानसिक त्रासातून ही कुटुंबं जात आहेत. त्यामुळेच या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. आपले अनुभव सांगत असतानाच त्यांनी राज ठाकरे यांचे आभार देखील मानले.