मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महिला आणि बालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील संकटग्रस्त महिला व बालकांना तातडीने आवश्यक ती माहिती व सहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडून नवी हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत मिशन शक्ती अंतर्गत 181 महिला हेल्पलाइन ही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या हेल्पलाईनमुळे संकटात सापडलेल्या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधारदेखील मिळणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती व समुपदेशन सुविधादेखील या हेल्प लाईनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभागाचे आयुक्त यांच्याकडून महिला हेल्पलाइन सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हि संपूर्ण योजना पूर्णपणे केंद्र पुरस्कृत असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती या एकछत्री योजनेतील महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपाययोजनेंतर्गत ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.