हिंदू समाज मुळातच लोकशाहीवादी व संविधानाला मानणारा आहे. जातीपातींच्या भिंती तोडून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सर्वांची जबाबदारी असून जागृत हिंदूच संविधानाचा रक्षणकर्ता असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व लेखक नरेंद्र पेंडसे यांनी केले. निगडी यमुनानगर मधील सहयोग फाउंडेशन व आधार जेष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने स्केटिंग ग्राउंड यमुनानगर येथे “महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
प्रमुख वक्त्यांचे स्वागत आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील व ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन ढमाले यांनी तर प्रास्ताविक सहयोग फाउंडेशन चे धनाजी शिंदे यांनी केले.
पुढे बोलतांना पेंडसे म्हणाले, समाजात जाती जातींमध्ये व गटागटांमध्ये भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या शक्तींपासून सावध राहणे व सर्व समाजाला सोबत घेऊन सलोखा टिकवण्याची जबाबदारी समाजातील ज्येष्ठ नागरिकांची आहे, भारतावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतला आणि आज ती वेळ पुन्हा आली आहे, वक्फ बोर्डाच्या निमित्ताने संविधानाच्या विरुद्ध कायदे झाले आहेत. जर महाराष्ट्राने देश विघातक शक्तींना येत्या निवडणुकीत आळा घातला नाही तर पुढील काळात या शक्ती भारताचे विभाजन घडवून आणतील , “सावध ऐका पुढील हाका” असा इशाराही त्यांनी दिला. कमी मतदानाने लोकशाही कमकुवत होते त्यामुळे शंभर टक्के मतदानासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सूत्रसंचालन अनिल अढी तर आभार राजेंद्र त्रंबके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक वाळके पाटील, गणेश कुलकर्णी , आदित्य कुलकर्णी, प्रदीप पाटील यांनी परिश्रम घेतले, व्याख्यानाला मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.