जायकाच्या 550 कोटीच्या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार ? विवेक वेलणकर यांचा सवाल (व्हिडिओ)

200 0

पुणे- पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी पुणे महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांचा वाढीव खर्च येणार आहे. या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

पुणे शहरात निर्माण होणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, पुणे महापालिका आणि जपानमधील जायका कंपनी यांमध्ये फेब्रुवारी २०१५ मध्ये करार झाला. या ९९० कोटी रुपयांच्या प्रकल्पातील ८५% म्हणजे ८४२ कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार होतं तर उर्वरित १५ % म्हणजे १४८ कोटी रुपयांचा खर्च पुणे महापालिका करणार होती. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार होता.

याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले की, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या प्रकल्पाची फक्त टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला तब्बल सात वर्षे लागली आणि अर्थातच प्रकल्पाचा खर्च साडेपाचशे कोटी रुपयांनी वाढला. केंद्र सरकार ८४२ कोटी रुपयेच देणार असल्याने हा वाढीव खर्च पुणे महापालिकेच्या अर्थात पुणेकर नागरिकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. खरं तर याची चौकशी करून जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असताना टेंडर मंजुरीपर्यंत प्रकल्प आल्याचा उत्सव साजरा केला जात आहे.

त्यामुळे अर्थातच या सात वर्षांत आलेली वाढीव दराची टेंडर्स रद्द करावी लागण्यापासून ते अक्षम्य प्रशासकीय दिरंगाईपर्यंत सर्व गोष्टींवर पांघरूण घातले जाणार आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासाप्रमाणे आता हा प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होऊन पूर्ण व्हायला नियोजित तीन वर्षांच्या कालावधीच्या किती पट जास्त वेळ लागेल हे परमेश्वरच जाणे.

२०१५ मध्ये या प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळी महापालिकेच्या रेकाॅर्ड प्रमाणे ( जे मुळातच संशयास्पद होते ) पुण्यात ७७ कोटी लिटर प्रति दिनी सांडपाणी निर्माण होत होते ( त्यावेळी पुण्याचा पाणी वापर १२० कोटी लिटर प्रति दिनी होता आणि त्यातील ८०% पाण्याचे सांडपाणी होते असे मानक गृहीत धरले तर हा आकडा मुळातच ९६ कोटी लिटर प्रति दिनी सांडपाणी निर्मिती असा असणे आवश्यक होते) , यापैकी तेव्हा ५७ कोटी लिटर सांडपाणी प्रति दिनी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येत होते.

जायका प्रकल्पातून भविष्याचा विचार करून आणखी ३० कोटी लिटर सांडपाणी प्रतिदिनी प्रक्रिया करून नदीत सोडण्याचा संकल्प आहे. म्हणजेच जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकूण ८७ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येणार आहे. आज पुणे महापालिका १४५ कोटी लिटर पाणी प्रतिदिनी धरणांमधून उचलते आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांप्रमाणे यातील ८०% पाण्याचे सांडपाणी तयार होते हे गृहीत धरले तर आजच पुण्यात प्रति दिनी ११५ कोटी लिटर सांडपाणी तयार होते आहे. अगदी हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल असे गृहित धरले तरी त्यावेळी सुध्दा फक्त प्रति दिनी ८७ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया करुन नदीत सोडण्यात येईल, म्हणजे पुण्याचा पाणीवापर पुढचे तीन वर्ष आजच्या इतकाच राहिला तरी त्या वेळी ही प्रति दिनी ३० कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडण्यात येणार आहे, म्हणजेच स्वच्छ नदीचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाही असे वेलणकर म्हणाले.

तरीही नदी पूर्ण स्वच्छ झाली असेल या गृहीतकावर पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने नदीकाठ सुंदर करण्यासाठी तब्बल ४७०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणण्याचा घाट का घातला आहे. असा सवाल वेलणकर यांनी विचारला आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!