अन् शरद पवार झाले बारामतीचे पहिल्यांदा आमदार

197 0

साल होतं 1967 आणि हीच ती विधानसभा निवडणूक होती ज्या ज्या निवडणुकीत बारामतीचा एक तरुण वयाच्या 27 साव्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनला आणि मग पुढं महाराष्ट्राचा चार वेळा मुख्यमंत्री बनला. नाव अर्थात, शरद पवार! शरद पवार पहिल्यांदा कसे बनले आमदार आणि 1967 च्या निवडणुकीत काय घडलं? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात… विधानसभा फास्ट फॉरवर्ड या विशेष मालिकेचा दुसरा भाग… किस्सा 67 चा!

1967 च्या निवडणुकीवेळी पहिल्यांदाच विधानसभेच्या जागा 264 वरून 270 करण्यात आल्या. काँग्रेस, भारतीय जनसंघ, रिपाइं, शेकाप यांच्यात मुख्य लढत झाली. काँग्रेसनं 270 तर शेकापनं 58 जागा लढवल्या. भारतीय जनसंघानं 166 तर रिपाइंनं 79 जागा लढवल्या. एकूण 09 पक्ष आणि 463 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. निवडणूक निकाल लागला आणि काँग्रेसनं 203 जागांवर विजय मिळवला. शेकापनं मुसंडी मारत 19 जागा जिंकल्या. भारतीय जनसंघाला मात्र अवघ्या 04 जागा जिंकता आल्या तर रिपाइंनं 05 जागी विजय मिळवला. 09 पक्षांपैकी 08 पक्षांना जागा जिंकता आल्या पण 40 जागांवर लढलेल्या स्वतंत्र पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसनं 270 पैकी 203 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आणि वसंतराव नाईकांच्या गळ्यात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

आता वळूयात त्या युवा आमदाराकडं ज्यानं याच निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि मग राजकीय इतिहास रचला. मी ज्या राजकीय व्यक्तीविषयी सांगतोय त्यांचं नाव आहे शरद पवार. आपल्या राजकीय कारकीर्दीत कधीही वैयक्तिक पराभव न पाहाणारे शरद पवार याच निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 27 वर्षे!

मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी नाराज होते. 27 वर्षांच्या शरद पवारांना तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार का, असा प्रश्न केला खरा पण शरद पवार यांच्या उमेदवारीला बारामतीमधूनच विरोध करण्यात आला होता. बारामती तालुका काँग्रेसनं एक विरुद्ध 11 या मतांनी पवार यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला. पुणे जिल्हा काँग्रेसनं हा प्रस्ताव राज्य कार्यकारणीकडं पाठवला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढं उमेदवारांची नावं आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले. त्यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसनं बारामती तालुका काँग्रेसचा प्रस्ताव पुढं करून शरद हा नवखा आहे. त्यामुळं त्याला उमेदवारी दिल्यास बारामतीमधून पराभव होण्याची शक्यता आहे, असं यशवंतराव चव्हाण यांना सांगितलं. मात्र, शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी विनायकराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण आग्रही होते. शरद पवार यांचं राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात या निवडणुकीबाबत माहिती देण्यात आलीये. शरद पवार यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या एकाला यशवंतराव चव्हाणांनी विचारलं, 270 पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल? त्यावर संबंधित नेता म्हणाला, ‘190 ते 200 जागांवर विजयी होऊ.’ त्यावर चव्हाणांनी प्रतिप्रश्न करत 80 उमेदवार पराभूत होतील, असा अर्थ आहे का?’ त्यावर त्या नेत्यानं होय असं उत्तर दिलं. मग त्याचाच आधार घेऊन यशवंतराव म्हणाले, ‘ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या.’ यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची अशी उमेदवारी दिली. मात्र, स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध कायम राहिला अखेर उमेदवारी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी बारामती गाठून प्रचारास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरूच होता. काहींनी तर सामूहिक राजीनामेदेखील दिले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर युवक आले होते. त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली. अखेर याच युवा वर्गानं 27 वर्षांच्या उमेदवाराला विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा दुप्पट मताधिक्य देत विजयी केलं आणि शरद पवार सर्वांत तरुण आमदार बनले.

पुढं 11 वर्षांनी हाच तरुण त्याच्या वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचा सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनला. मग मात्र शरद पवारांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री, कृषिमंत्री आदी विविध महत्त्वाची पदं देखील त्यांनी भूषवली. शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री बनले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात त्यांनी काम केलंय. देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मानही शरद पवार यांच्याकडंच आहे.

आज हेच शरद पवार आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष असून आजही हा 84 वर्षांचा तरुण राजकारणात सक्रिय आहे. इतकंच नव्हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज देखील झालेत.

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!