राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना शरद पवारांची साथ सोडून गेलेले अनेक नेते हे पुन्हा शरद पवारांकडे येताना पाहायला मिळत आहेत. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे तुतारी हाती घेण्याची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय..
नेमकी ही चर्चा का होत आहे यामागील नेमकं कारण काय आहे पाहूयात…
शरद पवार यांचं पुण्यातील निवासस्थान असणाऱ्या मोदी बागेत आज अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या भेटी-गाठी घेतल्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबन मामा शिंदे, पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे, अमित भांगरे आधी नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे राज्याचे सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दिलीप वळसे पाटील अनुपस्थित होते. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केली असून शरद पवारांचे मानसपुत्र म्हणूनही दिलीप वळसे पाटील ओळखले जायचे. मात्र अजित पवार यांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचं अजित पवारांसोबत जाणं हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता पुन्हा दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय…