Pune Police

PUNE POLICE ON CRIME दहशत वाजवणाऱ्या रिल्स दिसल्यास करणार थेट कारवाई

179 0

पुण्यातील अनेक कुख्यात गुन्हेगार हे सेलिब्रिटी असल्यासारखे रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकत आहेत. आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांचे समर्थक त्यांच्याप्रमाणेच रील्स बनवून सोशल मीडियावर दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत. कधी हातात पिस्तूल, तलवार तर कधी कोयता घेऊन रिल्स केले जातात. तर कधी चक्क खंडणी मागतानाचे, कोणालातरी धमकावताना चे व्हिडिओ स्वतःच्याच स्टेटस आणि स्टोरीला ठेवले जातात. या सगळ्या मागे उद्देश एकच समाजात दहशत माजवणं..आणि अशाच सोशल मीडियावर थैमान घालणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत

कालच कुख्यात गुंड गजा मारणे याला गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे वकील एडवोकेट विजयसिंह ठोंबरे हे देखील हजर होते.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना ताकीद देण्याची ही पहिलीच वेळ नसून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यातल्या अनेक सराईत गुन्हेगारांना आणि टोळ्यांच्या प्रमुखांना आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड काढली होती.‌ इथून पुढे शहरात गुन्हेगारांनी दहशत माजवणारी आणि गुन्हेगारी वाढवणारी कृत्य करू नयेत अशी सक्त ताकीद तेव्हाच देण्यात आली होती.

नवीन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक गुंडांना आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड काढली. समाजात गुन्हेगारी वाढूवू नये, अशी ताकीदही दिली. त्यानंतर काही दिवस पुणे शहर शांत असल्याचं भासत होतं. मात्र पुन्हा पुण्यात गुन्ह्यांची संख्या वाढली. कोयता गॅंगचे हल्ले वाढले, हत्येच्या आणि गोळीबाराच्या घटनाही वाढल्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या या परेडमुळे गुन्हेगारांचं उदात्तीकरण झालं अशी टीकाही करण्यात आली. त्यातच नुकतंच वनराज आंदेकर यांची हत्या झाली. त्यामुळे पुन्हा पुण्यात टोळी युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीवर आधारित गाणी लावून, हातात हत्यारं घेऊन आपले फोटो व्हिडिओ पोस्ट करण्याचा ट्रेंड ही वाढला. आणि त्यालाच आळा घालण्यासाठी अशा गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितल्याप्रमाणे सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुणे पोलिसांची करडी नजर आहे. समाजात दहशत पसरवणाऱ्या रिल्स बनवणाऱ्यांवर इथून पुढे थेट आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे. या रिल्स बनवणाऱ्यांमध्ये विशेषतः 15 ते 21 या वयोगटातील मुलांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे आपली मुलं सोशल मीडियावर नेमकं काय करतात याकडे पालकांचे लक्ष असणं अतिशय गरजेचे आहे. अन्यथा पोलिसांच्या कडक कारवाईला सामोरं जावे लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide