पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा राडा; 5-6 वाहनांना धडक, गौरीचे साहित्य आणायला गेलेल्या महिलेला चिरडलं

191 0

पुण्यात काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कर्वे रोडवरील करिष्मा चौक ते पौड फाटा या रस्त्यावर एका मद्यधुंद टेम्पो चालकाने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना रविवारी रात्री घडली. आशिष अनंत पवार (वय २६, रा. गणपती माथा, वारजे) असं या टेम्पोचालकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर या अपघातात गौरी गणपतीचे साहित्य घेण्यासाठी गेलेल्या गीतांजली श्रीकांत अमराळे (वय ३५, रा. शास्त्रीनगर) या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती श्रीकांत अमराळे हे या अपघातात जखमी झाले आहेत.

आरोपी टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली असून याबद्दलचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्वे रोडवरील करिष्मा चौकातून पौड फाट्याच्या दिशेने जाताना हा टेम्पो भरधाव वेगात होता. चालकाने करिष्मा चौकात एका वाहनाला धडक दिली. त्यानंतरही वेग कमी न करता पुढे जाऊन पुन्हा सिग्नलला एका रिक्षाला नंतर कारला आणि पुढे दोन ते तीन दुचाकींना धडक दिली. त्याचवेळी पौड फाटा चौकातून श्रीकांत अमराळे हे आपल्या दुचाकीवरून कर्वे रोडच्या दिशेने वळत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गीतांजली आमराळे यांना गंभीर दुखापत झाली. जवळच्या गणेश मंडळांनी तात्काळ धाव घेत जखमींची मदत केली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखलही केले मात्र त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं असून तीन ते चार दुचाकी चालक जखमी आहेत.

Share This News
error: Content is protected !!