घरात बाप्पाचं आगमन, प्रसन्न वातावरण आणि दुसऱ्याच दिवशी संपलं पूर्ण कुटुंब; अहमदनगरमध्ये रक्तरंजित हत्याकांड
घरात गणपती बाप्पाचं आगमन झालं. मोठ्या उत्साहात सगळ्यांनी बाप्पाची पूजा केली. मात्र दुसऱ्याच दिवशी या कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना अहमदनगर मधील चिकन पाडा येथे घडली असून संपूर्ण जिल्हा या घटनेने हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पती-पत्नी आणि मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मृत कुटुंबातील भावानेच आपल्या भावाचा, वहिनीचा आणि पुतण्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मदन जैतू पाटील, अनिशा मदन पाटील या पती-पत्नी सह त्यांच्या दहा वर्षीय मुलाचा म्हणजेच विवेक मदन पाटील याचा देखील निर्घृण खून करण्यात आल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाऊ हनुमंत जैतू पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी जैतू पाटील यांनी जमीन खरेदी केली. त्यांना हनुमंत आणि मदन ही दोन मुलं आहेत. दोघांचाही विवाह झाल्यानंतर हे दोघेही नवीन घरात राहायला गेले. आई- वडील हे गावच्या घरी राहत होते. हे घर मदन यांच्या नावावर असल्याने भाऊ हनुमंत हा वारंवार वाद करायचा. आपला हिस्सा आपल्याला द्यावा अशी मागणी तो करत होता. यावरून भावांमध्ये सतत वाद होत होते. असेच वाद घटना घडल्याच्या रात्री देखील झाले. घरात गणपती बाप्पाचा आगमन झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर हनुमंत याने या तिघांचाही खून केला. सकाळी नेरळ कळंब रोडवरील एका नाल्यात मुलगा विवेक मदन पाटील याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला.
या घटनेची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना लोक शोधत असतानाच सात महिन्यांची गरोदर असलेली विवेकची आई अनिशा यांचा मृतदेह देखील नाल्यात आढळून आला. त्यानंतर त्यांच्याच घरी मदन पाटील यांचा देखील मृतदेह सापडला. ही माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी हनुमंत पाटील याला पोलिसांनी अटक केली असून हे खून त्याने नेमके कसे केले ? या खुनात आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास नेरळ पोलिसांनी सुरू केला आहे.