पोलीस असल्याचे भासवून महिलेला केले विवस्त्र; पुण्यातील खळबळजनक घटना, वाचा सविस्तर

175 0

सायबर चोरट्यांनी आधी लाखोंचा गंडा घालत नंतर महिलेला व्हिडिओ कॉल वर विवस्त्र व्हायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी महिलेने या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.‌

नेमकं प्रकरण काय ?

पुण्यातील सदाशिव पेठ येथे राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला आयटी सेक्टर मध्ये काम करते. या महिलेला चोरट्यांनी संपर्क केला व महिलेच्या नावे मलेशियामध्ये एक पार्सल पाठवले असून या पार्सल मध्ये खोटे 12 एटीएम, खोटा पासपोर्ट व 140 ग्रॅम एमडी सापडल्याचे सांगितले. त्यावर या महिलेने हे पार्सल आपले नसल्याचे सांगितले. मात्र बेकायदेशीर वस्तू आढळल्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल, अन्यथा अटक होईल, अशी भीती दाखवत या महिलेला गंडा घातला.

प्रथम या चोरट्यांनी आपण दिल्लीतील वसंत कुंज पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी बँकेत पैसे जमा करावे लागतील. असे सांगून या महिलेला चोरट्यांच्या खात्यात दोन लाख 22 हजार रुपयाची रक्कम टाकायला सांगितली. ही रक्कम टाकल्यानंतरही पुन्हा महिलेची संपर्क साधून तुम्ही तुमच्या शरीरात अंमली पदार्थ लपवले असा संशय आहे. त्यामुळे तुमचे थर्मल इमेजिंग करावे लागेल, असे सांगून या महिलेला व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले.

या घटनेनंतर महिलेने तात्काळ सदाशिव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!