पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील काम तातडीनं सुरू करा – गिरीश बापट

400 0

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसराचे झपाट्याने होणारे शहरीकरण, तसेच रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांतून पुण्यात होणाऱ्या स्थलांतराचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर  होत आहे.

शहरातील वाहतुकीची  स्थिती चिंताजनक होत असल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किलोमीटर विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, असा मुद्दा भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट  यांनी लोकसभेत मांडला.

केंद्र सरकारचे महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेच्या खासदारांना मिळालेले नियम ३७७ हे संसदीय आयुध आहे. या अंतर्गत खासदार बापट यांनी हा मुद्दा मांडला. महाराष्ट्र मेट्रोने फेज २ साठी सर्वेक्षण आणि नियोजन सुरू केले आहे, असे निदर्शनास आणून दिले. सध्याच्या ३३.१ किमी मेट्रो मार्गांचे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किमी लांबीचे मार्गाचा विस्तार करण्यासाठी अहवाल (डीपीआर) तातडीने करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

 

दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणात वनाज ते चांदणी चौक (१.५ किमी), रामवाडी ते वाघोली (१२ किमी), हडपसर ते खराडी (५ कि.मी.), स्वारगेट ते हडपसर (७ किमी), खडकवासला ते स्वारगेट (१३ किमी) आणि एसएनडीटी ते वारजे (८ किमी) तसेच पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ किलोमीटरचा सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide