आळंदी- साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढ़ी पाढ़व्याच्या शुभमुहूर्तावर, आजपासून आळंदी येथील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलीच्या स्पर्श दर्शनाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील भाविकांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील तमाम भाविकांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. गेले दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विठुरायाचे बंद असलेले पायावरील दर्शन व्यवस्था आज गुढी पाडव्यापासून सुरु झाली असून भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अंतर आता दूर झाले आहे. या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे.
आज सकाळी सहापासून दर्शनबारीला सुरुवात झाली असून विठ्ठल भक्तांनी आपले मस्तक थेट विठुरायाच्या चरणावर ठेवून दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. आता मंदिरात देवाला प्रिय असणारा तुळशी हार आणि प्रसाद देखील नेता येत असल्याने शेकडो लहान व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज गुढी पाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात पुणे येथील विठ्ठल भक्त नाना मोरे आणि नवनाथ मोरे यांनी फुलांची व फळांची आकर्षक सजावट सेवा दिली आहे. विठ्ठल गाभारा , रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळाखांबी या ठिकाणी झेंडू , जरबेरा , शेवंती , गुलछडी , ऑर्किड , ग्लायोऊड , गुलाब , तगर अशा विविध रंगी सुगंधी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत 1100 किलो फळे आणि 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.
दुसरीकडे गुढ़ी पाढ़व्याच्या शुभमुहूर्तावर, आजपासून आळंदी येथील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलीच्या स्पर्श दर्शनाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठी नववर्षाची सुरुवात माऊलीच्या दर्शनापासून करण्यासाठी वारकऱ्यांनी आळंदी येथील मुख्य समाधी मंदिरात मोठी गर्दी केली आहे. जवपास दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वारकऱ्यांना माऊलीची प्रत्यक्ष स्पर्श भेट घेता येत असल्याने, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत आहे.